गडचांदूर : राजुरा येथून कोरपना, वणी मार्गे नागपूरसाठी लाॅकडाऊन पूर्वी थेट बस सेवा होती. मात्र ती अद्यापही पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून नागपूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हा मार्ग अगदी कमी अंतराचा व सोयीस्कर असल्याने प्रवासी याच मार्गे जाणे पसंत करतात. राजुरा आगार व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
कोरपना : तालुक्यातील रूपापेठ फाटा - खडकी, परसोडा-रायपूर, कोठोडा खु-गोविंदपूर, धोपटाला-शेरज बु-पिपरी, नारांडा-पिपरी, कोडशी खु-पिपरी, कातलाबोडी-बोरगाव, कन्हाळगाव-कोरपना-कुसळ, खैरगाव-कोरपना, सावलहिरा-येल्लापूर, हातलोणी-घाटराई, टांगाला सावलहिरा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
भोयेगाव मार्ग झाला धोकादायक
गडचांदूर : भोयगाव-गडचांदूर, भोयेगाव-वनसडी, कवटाळा-राजुरा मार्गावरील रस्त्याचे काम मागील अनेक अनेक दिवसापासून सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी पसरविण्यात आली आहे. या मार्गाने जाण्यासाठी सायकल, दुचाकीस्वारांनी मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे रस्त्याचे कामे त्वरित करून दिलासा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्राचीन गुफेकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष
जिवती : कोरपना व जिवती तालुक्यात कारवाई व शंकर लोधी येथे ऐतिहासिक गुफा आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही त्याची पुरातत्व विभागाच्या शासन दप्तरी नोंद नाही. या परिसराचा इतिहास समोर येण्यासाठी या गुफाचे संशोधन करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये त्याची माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भद्रावतीत वीज ग्राहक त्रस्त
भद्रावती : येथे भारनियमन नसताना ६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजतापासून सायंकाळपर्यंत जवळपास २० ते २५ वलेळा वीज चालू बंद होत होती. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरातील विविध वाॅर्ड ग्रामीण फिरसोबत जोडल्या गेले आहे. सलग एक किंवा दोन तासाचे भारनियमन करावे; परंतु वारंवार जाणाऱ्या विजेवर नियंत्रण आणावे, अशी मागणी प्रा. सुधीर मोते यांनी केली आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
पाणंद रत्यामुळे भांडणे वाढली
भद्रावती : ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणंद रस्ते आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत.
माणिकगड पहाड ठरतोय ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी
जिवती : राजुरा, जिवती, कोरपना तालुक्यात असलेला माणिकगड पहाड हौशी ट्रेकर्ससाठी अद्भुत पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यातील सात बहिणीचा डोंगरसह याही पहाडाचा विकास साधल्यास पर्यटनदृष्ट्या येथील विकासाला चालना मिळेल. तसेच ट्रेकर्सनासुद्धा अन्य ठिकाणी जाऊन ट्रेकिंग करण्याची गरज पडणार नाही.
भद्रावती, राजुरा येथे संग्रहालय उभारा
राजुरा : जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भद्रावती नगरी व निजामकालीन राजुरा शहरात ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात यावे. या भागातील ऐतिहासिक पाऊलखुणा जतन होईल. त्या माध्यमातून भावी पिढीला इतिहास समजण्यास सोपे होईल. पुरातत्व विभागाने लक्ष देऊन संग्रहालय उभारावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
मुडझा-गांगलवाडी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मुडझा-गांगलवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होण्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ब्रह्मपुरीपासून गांगलवाडी व मुडझा हे दोन्ही ठिकाणे २० ते ४० कि मी अंतरावर आहेत. मुडझा व गांगलवाडी ही दोन्ही ठिकाणे लोकसंख्येने मोठी आहेत. कर्मचारी, व्यापारी, शाळकरी विद्यार्थी, महिला या रस्त्याचा वापर करतात. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून गांगलवाडी-मुडझा रस्ता अतिशय खड्डेमय झाला आहे.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. अनेकदा येथे कठडे बसविण्याची मागणी करण्यात आली. मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.