अनुपकुमार यांचे मनोगत : भंगाराम तळोधीत पार पडले शिबिरगोंडपिपरी: गोंडपिपरीसारख्या आदिवासी दुर्गम भागात महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेऊन शासनाला शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य शोषित, वंचित घटकांचे समाधान करायचे आहे. यासाठीच शासनाचे हे समाधान शिबिर अभियान असून त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन नागपूर विभागाचे (महसूल) विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी समाधान शिबिर व जनजागरण मेळावातून नागरिकांना केले. २७ आॅक्टोबरला तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे आयोजित शासकीय समाधान शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, जि.प. सदस्य अमर बोडलावार, पं.स. सदस्य पुष्पा तिवाडे, भंगाराम तळोधीच्या माधुरी गेडाम, उपसरपंच अजय तुम्मावार, तहसीलदार मल्लीक विराणी, संवर्ग विकास अधिकारी यशवंत मोहितकर उपस्थित होते. महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर परिसरात महसूल विभाग, तालुका कृषी अधिकारी, आरोग्य विभाग, वनविभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बाल कल्याण विभाग, बँक आॅफ इंडिया, संवर्ग विकास अधिकारी आदी कार्यालयाने आपले स्टॉल्स लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गंत बँक आॅफ इंडिया, शाखा भंगाराम तळोधी तर्फे शिबिरात आठ युवकांना रुपये ५० हजार ते पाच लक्ष इतक्या रकमेचे व्यवसायाकरिता कर्ज प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या शिबिरात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या हस्ते योजनेची धडाक्याने सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. सर्व पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल यांनी केले तर संचालन सचिन फुलझेले यांनी केले. आभार तहसीलदार मल्लीक विराणी यांनी मानले. कार्यक्रमात सर्वच शासकीय विभागानी सहभाग घेतला. समाधान शिबिर तथा जनजागरण मेळाव्यात शासनाच्या १३ विभागांनी आपले स्टॉल्स लावून विविध वस्तू व दाखल्यांचे प्रत्यक्ष वाटप केले. तहसील विभागांचे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या सात लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारांचे धनादेश, कृषी विभागातर्फे मोहरी बीज वाटप, आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप, एकात्मिक बालविकास कार्यालय, गोंडपिपरीतर्फे शिलाई मशिन व सौरकंदिल वाटप करण्यात आले. पंचायत समितीतर्फे शौचालय अनुदानाचे धनादेश वाटप, महसूल विभागातर्फे उत्पन्न, राशनकार्ड आदी वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
समाधान शिबिराअंतर्गत शेतकरी, सर्वसामान्याचे समाधान करणार
By admin | Updated: October 30, 2015 01:16 IST