राजुरा : राजुरा तालुक्यातील सिर्सी या गावाजवळील वनविभागाच्या क्षेत्रातील ओढ्यातून रेती उपसा करून वाहतूक करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर पकडले.
याप्रकरणी भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला असून, रेती भरलेले हे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. १५ जानेवारीला रात्री ३ वाजता गस्त घालणाऱ्या पथकाने ही कारवाई केली.
राजुरा वनपरिक्षेत्रातील टेंबुरवाही परिमंडळातील सिर्सी नियत क्षेत्रातील ओढ्यातून उपसा करून ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरटी वाहतूक सुरू होती. रात्री गस्त सुरू असताना या पथकाने घटनास्थळी ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४-४६७८ आणि एमएच ३४-२२३७ हे दोन ट्रॅक्टर पकडले. या दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये प्रत्येकी १०० घनफूट रेती भरलेली होती. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिचबोडी येथील राहुल साळवे यासह आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहायक कटकू, वनरक्षक वर्षा वाघ, प्रियंका जावळे, चौबे, दिलीप जाधव, वनमजूर विनोद सोयाम, मोहितकर आदींनी कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.