राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात वनविभागाचे पाच कार्यालय असून वृक्ष संवर्धनासोबतच वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहेत. मात्र वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यातून वनविभाग मार्ग कसा काढेल, याकडे लक्ष लागले आहे.मूल तालुक्यात पाच वनविभागाचे कार्यालय असून यात वनपरिक्षेत्र बफर, नॉन बफर, सामाजिक वनीकरण, एफ. डी. सी. एम. कार्यालय व विशेष व्याघ्र संरक्षण दल आदींचा समावेश आहे. वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी सदर कार्यालय प्रयत्नशील आहेत. मात्र वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाघासाठी क्षेत्र कमी पडायला लागले आहे. त्यामुळे वाघाने आता शेतकरी बांधवांच्या शेतात आपले बस्तान ठोकले असल्याचे दिसून येते. मूल नॉन बफरमधील चिचाळा बिटात शेतात गवत कापण्याचे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून शंकर किसन दुधबळे या इसमाला ठार केले. हाकेच्या अंतरावर मृतकाचा मुलगा व सून काम करीत असताना त्याच्या डोळ्यादेखत वाघाने शंकरचा बळी घेतला. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच्या विरूद्ध दिशेला असलेल्या बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा या वर्दळीच्या रस्त्यावर दोन वाघ दिसल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे.कोसंबी गावातील शेतात वासुदेव लोनबले यांंना या वाघाचे दर्शन झाले. मानवी वस्तीकडे वाघाने धाव घेतल्याने मानव प्राणी संघर्ष होणे स्वाभाविक आहे. वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. मात्र मानवाचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून पर्याय शोधणे काळाची गरज आहे.
मूल-मारोडा रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST
वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यातून वनविभाग मार्ग कसा काढेल, याकडे लक्ष लागले आहे.
मूल-मारोडा रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : वनविभागाने लक्ष द्यावे