फोटो
वरोरा : वरोरा शहरासह तालुक्यात कोरोना आजाराची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक रुग्णांनी रुग्णालयात खाटा आणि प्राणवायू न मिळाल्यामुळे आपला प्राण सोडला. मात्र शहरात आता दोनशे खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होत असून त्यापैकी शंभर खाटा सज्ज झाल्या आहेत.
वरोरा शहर आणि तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दररोज १५० ते २०० रुग्णांचे चाचणी अहवाल सकारात्मक येत असून त्यांना बेड मिळणे अवघड झाले आहे. काहींना प्राणवायूची गरज असल्यामुळे त्यांनी चंद्रपूर, तेलंगणा, नागपूर आदी ठिकाणी धाव घेतली. मात्र आता तिथलीही स्थिती बिकट झाल्याने रुग्णांचा इलाज कसा करावा, हा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे. शहरात सध्या आदिवासी वसतिगृहामध्ये १२५ खाटा असून त्या ठिकाणी विलगीकरणात असलेले रुग्ण ठेवण्यात आले आहे. ट्रॉमा केअर युनिटमध्ये ७० खाटा असून त्यापैकी १८ खाटा प्राणवायूच्या आहेत; मात्र रुग्णांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असून त्यांच्या करता प्राणवायूयुक्त असे जम्बो कोविड केअर युनिट तातडीने निर्माण करण्याची गरज आहे. याकरिता काही सामाजिक संघटनांनी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना तशी विनंतीही केली. त्याची दखल घेत वरोरा चिमूर मार्गावरील माता महाकाली पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आता वरोरा नगर परिषदेच्या साहाय्याने २०० खाटांचे जंबो कोविड केअर युनिट तयार होत आहे. त्यापैकी शंभर खाटा आता सज्ज झाल्या असून त्यातील काही खाटा प्राण वायूने सज्ज असतील. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुजनकर यांनी दिली.
बॉक्स
विनामूल्य दिली इमारत
या कोविड केअर सेंटरकरिता माता महाकाली संस्थेचे अध्यक्ष सचिन साधनकर यांनी विनामूल्य इमारत उपलब्ध करून दिली असून महाविद्यालयात ४०० खाटापर्यंतचे कोविड सेंटर तयार केले जाऊ शकते, असे साधनकर म्हणाले.
बॉक्स
धानोरकर दाम्पत्यानी दिली भेट
नुकतेच खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर यांच्यासह विलास टिपले, शुभम चिमूरकर, राजू महाजन, सुभाष दांदडे, डॉ. अंकुश राठोड आदींनी शहरातील सर्व कोविड सेंटर आणि कोरोना चाचणी केंद्राला भेट दिली. धानोरकर दाम्पत्याने रुग्णांची आस्थेने चौकशी करीत आरोग्य सेवेचा आढावा घेतला आणि तातडीने माता महाकाली महाविद्यालय आणि ट्रॉमा केअर युनिट येथे प्राणवायूच्या खाटा वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. याकरिता लागणारा निधी लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.