ब्रह्मपुरी : तालुक्यातील किन्ही व बोडधा या दोन ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ६८ ग्रामपंचायतीच्या ४८३ जागांसाठी १०९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. खऱ्या अर्थाने मंगळवारपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
तालुक्यात एकूण ७५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर किन्ही व बोडधा येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत अविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यासाठी एकूण १०९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी ६५१ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत, तर ४४२ पुरुष उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. यासाठी एकूण ९६,३९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी ४८,६६३ पुरुष मतदार असून ४७,७२७ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी एकूण २१४ मतदान केंद्रे असून, निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार धनश्री यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा तयारी करीत आहे.