लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बॅन्ड बाज्याच्या तालात वाजत गाजत मोठ्या थाटात लग्नकार्य करायचे स्वप्न अनेक विवाहयोग्य युवक युवतींनी बघितले होते. त्याप्रमाणे तयारीही केली होती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर निर्बंध लादले. मात्र तरीही कोरोनाला वाकुल्या दाखवत सुमारे अडीचशे जोडप्यांनी मोजक्याच आप्तेष्ठांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पडल्याची माहिती आहे. दिवाळीपासून लग्नकार्याला सुरुवात होते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लग्नकार्यासाठी सभागृहाच्या तारखा मिळविण्यासाठी मोठी शर्यंत असायची. मात्र मागील वर्षींपासून कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे लग्नकार्यावर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे मंगल कार्यालयासह लॉनला उतरती कळा आली. कोरोनामुळे अनेकांनी सुरुवातीला लग्न सोहळे पुढे ढकलले. परंतु, कोरोनाचा संसर्ग काही कमी होऊन त्यामुळे काहींनी नोंदणी पद्धतीने विवाह सोहळे उरकले. तर काही मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडला. मागील वर्षी सुमारे २५० जोडप्यांनी विवाह केले असल्याची माहिती आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना नियोजित तारखेला करण्यात येणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले होते. अनेकांनी मंगल कार्यालयांकडे पैसेही जमा केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सोहळे रद्द झाल्याने अनेक मंगल कार्यालय चालकांना पैसे परत करावे लागले. सध्यास्थितीत केवळ २५ लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकायचा असल्याने कोणत्या नातेवाहिकाला बोलवायचे आणि कुणाला नाही, असा प्रश्न पडत असल्याने बहुतेकजण लग्न समोर ढकलत आहेत.
वर्षभरात ५५ लग्नतिथीगतवर्षात तब्बल ५५ लग्नतिथी होत्या. मात्र कोरोनामुळे अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलेले. थाटामाटात लग्न सोहळा पार पाडावा, अशा अपेक्षेत असलेल्याच्या आनंदावर यंदाही विरजन पडले. त्यामुळे विवाहेच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
रजिस्टर्ड मॅरेजचा पर्यायदरवर्षी रजिस्टर्ड मॅरेजला पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. विवाहयोग्य मुलांना धुमधडाक्यात लग्न करणे आवडत होते. मात्र मागील वर्षीपासून कोरोनामुळे अनेकांनी रजिस्टर्ड मॅरेजचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे विनावश्यक खर्चाला कात्री बसत आहे.
मे कठीणचएप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. पण, मंगल कार्यालयात केवळ २५ जणांची उपस्थिती आणिी आरटी-पीसीआर तपासणी अनिवार्य केल्याने विवाह सोहळे पार पडणार की नाही, हे कठीणच आहे. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या संचालकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत
मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया
अनेकांनी लग्नसोहळे रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मे महिन्यातील बुकिंग बहुतांश रद्द झाली आहे. लग्नकार्यासाठी आता आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कुणीही मंगल कार्यालयात लग्न करण्यास तयार नाही.- मंगल बल्की, चंद्रपूर
गतवर्षी परिस्थिती सुधारेल या आशेवर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. पण आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेकांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यावरच संपूर्ण वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो.- स्वरीत पटेल, चंद्रपूर