उत्तम प्रतिसाद : अतिक्रमण हटविण्याची पद्धत चुकीची असल्याचा आरोपबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने पेपर मील कलामंदिर ते गुरूनानक महाविद्यालयापर्यंतचे सडकेच्या दोनही बाजूकडील अतिक्रमण हटविणे सुरू केले आहे. परंतु अतिक्रमण हटविण्याची न.प. ची पध्दत चूक असल्याच्या कारणाने नाराज होऊन येथील व्यापाऱ्यांनी या अतिक्रमण हटाव पध्दतीच्या विरोधात आज (दि. ६) बल्लारपूर बंद ठेवले. या बंदला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासून तर दुपारपर्यंत बंद होती. दुपारनंतर काही दुकाने उघडण्यात आलीत.अतिक्रमण हटविण्याला आमचा विरोध नाही. त्याच्या पध्दतीला विरोध आहे, असे बंदकर्त्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्यापूर्वी व्यापाऱ्यांना तशी सूचना द्यायला हवी होती. पण, तशी नोटीस न देताच अतिक्रमण हटाव पथक एकाएकी धडकले व या पथकाने तोडफोड सुरू केली. काहींनी मुदत मागितली. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अशा व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. नगर परिषदेने अतिक्रमीत जागेची सीमा आखून दिली असता तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले असते असेही व्यापाऱ्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. बल्लारपूर बिझनेस असोसिएशनचे या संदर्भात न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. पत्रपरिषदेत बिजनेस असोसिएशनचे भगवानदास गिदवानी ऊर्फ बल्लू सेठ, दादा मूसा, नरेश मुंधडा आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)कार्यवाही नियमानुसारचबल्लारपूर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम नियमानुसारच केली असल्याचे बल्लारपूर न.प. चे कार्यालय अधिक्षक विजय जांभुळकर यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची सूचना आॅटोने ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे, पूर्वसुचना दिली नाही, असे म्हणणे चूक असल्याचे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
अतिक्रमण हटावविरोधात व्यापाऱ्यांचे बल्लारपूर बंद
By admin | Updated: February 7, 2016 01:58 IST