सर्वपक्षीय आंदोलन : नगरपंचायत व कृषी विद्यापीठाची मागणी सिंदेवाही : मागील १० महिन्यांपासून सिंदेवाही नगर पंचायतीसाठी संघर्ष करणाऱ्या सिंदेवाहीच्या नागरिकांनी सर्वपक्षीय व व्यापारी असोसिएशन संघर्ष समितीच्या सहकार्याने मंगळवारी कडकडीत बंद पाळला. त्यामुळे सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली. यात चहाटपरी, पानठेले, सर्व दुकाने बंद होती. वृत्तपत्रव्यतिरिक्त शहरातील नागरिकांना दैनंदिन उपयोगी वस्तूंसाठी भटकावे लागले. नगर पंचायत मुद्दा शासन स्तरावर अटीतटीचा प्रश्न झाला आहे. लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकला. शासनाच्यावतीने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना अधिवेशन संपतेवेळी नगरपंचायत घोषित करण्याचे आश्वासन दिले होते. ते पण हवेत विरले. त्यामुळे सिंदेवाहीच्या नागरिकांनी बंद पाळला. या बंदला नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल पटेल, दीपक डेगानी, नितीन गुंडावार, साईनाथ कुर्रेवार, महेश इरटवार, राकेश मोहुर्ले, गोल्डी बिसेन, अनुप श्रीरामवार, प्रफुल तुम्मे, विवेक पेदुरवार, दीपक मोहुर्ले, संदीप बांगडे, स्वामी गोलपल्लीवार, केशव कावळे, प्रवीण मोगरे, अलोक सागरे तथा व्यापाऱ्यांनी प्रभारी नायब तहसीलदार एस. एस. मडावी, रामचंद्र नैताम यांना निवेदन दिले. यावेळी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन, शिवसेना, बीएसपी या सर्वपक्षीयांचा पाठिंबा होता. शासनाने याची दखल घ्यावी. (शहर प्रतिनिधी)
सिंदेवाहीत कडकडीत बंद
By admin | Updated: December 30, 2015 01:41 IST