फोटो
गजानन साखरकर
घुग्घुस : वर्धा नदी मुंगोली पुलावरून जात असताना कोळशाची वाहतूक करणारा एक ट्रक पुलाचे कठडे तोडत नदीत कोसळला. त्यात सुदैवाने चालक बचावला होता. घटनेला दोन महिने होऊनसुद्धा पुलाला कठडे लावलेले नाहीत. पुलावरील रस्त्यावर खड्डे पडून सळाखी बाहेर निघाल्या आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.
संबंधितांनी याची तत्काळ दखल घेऊन कठडे बसवावे व पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. वर्धा नदीवरील धानोरा व बेलोरा पुलाचे बेरिंग व मायको काँक्रिटिंग सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. मात्र पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी वेकोलीकडे असून, त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वेकोली वणी क्षेत्राने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर वाहने हळू चालविणे, असे लिहिलेले बोर्ड लावण्यात आले असले, तरी पुलावरून मोठया वेगाने कोळशाची वाहतूक होत आहे. या वेगवान वाहतुकीमुळे दुचाकी वाहनचालकाला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.