नांदा येथे आदिवासी मेळावा : राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादननांदाफाटा : आदिवासी हे देशाचे मुळ निवासी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या समाजातील शहीद विरांचा इतिहास दडून होता. आता आदिवासींनी आपला इतिहास वाचण्याची गरज असल्याचे मत आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी व्यक्त केले. नांदा येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा परिसरात शुक्रवारी आयोजित बिरसा मुंडा जयंती व आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी नेते जनार्धन पंधरे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, कोरपनाचे तहसिलदार पुष्पलता कुमरे, अवदेश आत्राम, प्रकाश तिराणिक, सरपंच पूजा मडावी, उपसरपंच बंडू वरारकर, संजय मुसळे, पुरुषोत्तम आस्वले, भास्कर लोहबळे, तलाठी गेडाम, प्राचार्य अनिल मुसळे, पुरुषोत्तम निब्रड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना जनार्धन पंधरे यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात आदिवासींचे आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाच्या निर्णयावर जोरदार टिका केली व यापुढे आदिवासींच्या सोयी सवलती मोडीस काढू नये, अशी मागणीही केली. आदिवासींना शिक्षण, आरोग्य आणि आरक्षणाचा लाभ मिळावा, त्यांना त्यांच्या योजना व सवलती मिळाव्या, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले. तर सुदर्शन निमकर यांनी आदिवासी हेच जंगलाचे खरे रक्षक असून त्यांच्यामध्ये प्रामाणिकता ठासून भरली असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक किशोर मडावी यांनी केले. संचालन बाबुराव जुमनाके यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रवीण कुरसंगे, अनिल पेंदोर, महादेव तिराणिक, देवानंद उईके, भारत आत्राम, कल्याणी मडावी, अनिल येरमे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती.मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक आदिवासी गोंडी नृत्याने करण्यात आले. गावात आयोजित हे गोंडी नृत्य विशेष आकर्षण ठरले. पारंपारिक ढोल व बासुरीने सादर झालेल्या या गोंडी नृत्याने गावातील नागरिक भारावून गेले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
आदिवासींनी आपला इतिहास वाचण करावे
By admin | Updated: November 22, 2015 00:45 IST