लातूर : निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाल्याने निलंगा उपजिल्हा रुग्णालयातून ‘सर्वोपचार’कडे रेफर करण्यात आले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला होता. त्याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समितीकडून डॉक्टर व नातेवाईकांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण संबंधित हजर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. तसेच रुग्णाला लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे रेफर केले. रुग्ण सर्वोपचारमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर स्थानिक डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. आवश्यक असलेले औषधोपचारही देण्यात स्थानिक प्रशासन कमी पडले. त्यामुळे उपचारादरम्यान राजकुमार बिराजदार यांचा १५ जून २०१५ रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू सर्पदंशाने नसून हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. नातेवाईकांनी आरोग्य उपसंचालक आरोग्य विभाग, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समिती मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. वाळकीकर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केली. ही समिती शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सकाळी दाखल झाली. समितीच्या वतीने सर्पदंश प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची प्रारंभी चौकशी केली. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत तक्रार करणारे नातेवाईक दिलीप बिराजदार व त्यांचा मुलगा मयूर यांची चौकशी केली. या चौकशी समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा यात्रा
By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST