नागभीड : राज्य परिवहन मंडळ व अन्य खासगी प्रवास सेवा सुरू असली तरी या वाहतुकीला प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे जाणवत आहे. या लाॅकडाऊनमध्ये ‘प्रवास’ ही लाॅकडाऊन झाला असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात सर्वच प्रवाशी साधने बंद करण्यात आली नसली तरी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यातच लग्न, विविध कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिकरीत्या घेण्यास मज्जाव आहे. शाळा व महाविद्यालये बंदच आहेत. आणि नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती वाढत्या मृत्यूमुळे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक बाहेर निघण्यास धजावत नाही. आणि निघालेच तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपली कामे करून येत आहेत. जोपर्यंत सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रमास सार्वजनिक रूपात आयोजनाकरिता परवानगी मिळणार नाही आणि शाळा महाविद्यालयात चहलपहल सुरू होणार नाही तोपर्यंत प्रवासाबाबत हिच परिस्थिती राहील असे यासंदर्भात बोलल्या जात आहे. याचाच परिणाम म्हणून की काय नागभीड मार्गे चालणाऱ्या एखाद दुसरा अपवाद वगळता राज्य परिवहन मंडळाच्या व खासगी बस रिकाम्याच दिसून येतात. यामुळेच अनेक टायमिंग बंद करण्यात आले असल्याची माहिती आहे.
नागभीड येथे जुना बसस्टाॅप, नवीन बसस्थानक आणि राम मंदिर चौक या बसस्थानकांवर प्रवाशांची पूर्वी नेहमीच चहलपहल दिसायचे मात्र सद्यस्थितीत या बसस्थानकांवर प्रवाशीच दिसत नसल्याचे दिसून येत आहे. अपवादात्मक परिस्थितीत नवीन बसस्थानकावर कधी कधी एखादा दुसरा प्रवाशी दिसून येतो. येथील नवीन बसस्थानक तर प्रवाशी अभावी सुनसान वाटत आहे.