चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या १२ जवानांना पेंच व्याघ्र प्रकल्पात कमांडो प्रशिक्षण देण्यात आले. या जवानांना अमेरिका व इंग्लंड येथील कमांडो प्रशिक्षकांनी सदर प्रशिक्षण दिले. यामुळे शिकारीच्या घटनांवर आळा बसणार असून वन्यप्राण्यांची सुरक्षा होणार आहे.डब्ल्यूसीटी, महाराष्ट्र वनविभाग, यूएसएआयडी व पँथरा या अशासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदर कमांडो प्रशिक्षण देण्यात आले. ९ दिवस या प्रशिक्षणाचा थरार ताडोबा व पेंच येथील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या दवानांनी अनुभवला. प्रशिक्षणादरम्यान, कमांडोंनी परिरक्षण नाका उभारणी, अरणयकला, मार्ग काढणे, गुप्त माहिती संकलन, गस्त नियोजन, प्रथमोपचार, नकाशा वाचन, मार्गक्रमण, स्वसंरक्षण, आरोपीशी दोन हात करणे, गुन्ह्यांचा छडा लावणे, आरोपीची उलटतपासणी करणे, अॅम्बुश लावणे, हवाई पाहणी आदीबाबत माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी शिकविण्यात आलेल्या सर्व बाबींना अनुसरून प्रशिक्षणार्थ्यांची कवायत करून घेण्यात आली. विशेष व्याघ्र संरक्षण दलाने एखाद्या कामगिरीवर जाताना त्यासाठी सर्वोत्तम तयारी करून निघणे आणि या दरम्यान येणाऱ्या संकटांना व आव्हानांना तोंड देणे हा या प्रशिक्षणामागचा हेतू होता. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ताडोबाचे क्षेत्रसंचालक जी.पी. गरड, पेंच प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षण विशेष व्याघ्र संरक्षण तलाच्या निवडक जवानांना टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
१२ जवानांनी घेतले कमांडो प्रशिक्षण
By admin | Updated: March 8, 2015 00:38 IST