नवरगाव : येथील विविध रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे गावातील रस्ते अरुंद झाले आणि दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने, वाहतुकीसोबतच पार्किंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
सिन्देवाही तालुक्यातील नवरगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, अंदाजे १४ ते १५ हजार लोकसंख्या आहे, शिवाय तीन हायस्कूल, दोन जुनिअर आणि एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. येथे दोन शासकीय बॅंक असून, तीन पतसंस्था आहेत, तसेच परिसरातील मुख्य बाजारपेठ, गुरुवारला आठवडी बाजार असल्याने परिसरातील २० ते २५ खेड्यांचा संपर्क या गावाशी येतो. त्यामुळे नेहमी वर्दळ असते. येथील बस स्थानक, माता चौकापासून तर आझाद चौक, काॅलेज रोड, रत्नापूर फाटा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक दुकाने असून, सदर रस्ता हा अरुंद आहे.
दोन्ही भागाला नाल्या आहेत. त्यामुळे मोठी अडचण व्हायची. ही गरज लक्षात घेऊन येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाच-सहा महिन्यांपूर्वी या मुख्य रस्त्याच्या दोन्ही भागांतील नाल्यावर सिमेंट फरशा मांडण्यात आल्या. मात्र, अलीकडे प्रवासी वाहने, खासगी वाहने खरेदी करायला दुकानात गेल्यावर रस्त्याच्या कडेला ठेवावी लागतात. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. रस्त्यावर, परंतु एखाद्याच्या दुकानासमोर वाहन ठेवल्यास दुकानदाराच्या दोन गोष्टी त्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकाला ऐकावे लागते. अशीच परिस्थिती गावातील इतर रस्त्यांची आहे.
येथील व्यावसायिकांचा माल नागपूरवरून खरेदी केल्यानंतर ट्रकच्या माध्यमातून माल दुकाना-दुकानामध्ये उतरवताना ट्रक रस्त्यावर असल्यास एखादे चारचाकी वाहन समोरून आल्यास वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर बनते, शिवाय याच मुख्य रस्त्यावर बँक असल्याने ग्राहकांना वाहन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्राहक रस्त्यावर वाट्टेल तशी वाहने ठेवतात.