शेतकरी त्रस्त : पोलीस प्रशासनाची कारवाई, भाव नाही अन् चुकारेही नाही वरोरा : आधीच दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला जेमतेम दर मिळत आहे. त्यातही रोखीने चुकारा नाही अशा अवस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाहनाने कापूस विक्रीला नेताना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष पसरला असून पोलीस विभागाने ही कारवाई थांबवावी, अशी मागणी होत आहे. बैलबंडीने कापूस विक्रीला नेण्यासाठी दोन व्यक्ती व बैलांसह ४० ते ४५ किमी अंतर पार करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत होते. यामध्ये वेळ तसेच खर्चही अधिक येतो. त्यामुळे अनेक शेतकरी आपला कापूस वाहनाने बाजारपेठेमध्ये नेत आहे. वाहनाच्या किराया द्यावा लागत असल्याने शेतकरी अधिकाधिक कापूस वाहनात कसा भरता येईल, याचा प्रयत्न करीत असतो. मात्र राज्य तसेच इतर मार्गावर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनाला पकडून दंड वसूल केला जात आहे. दंडाची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. वाहतुकीदरम्यान कापसाचे वाहन बाजूला लावून तपासणी सुरू केली जाते. यात बहुतांश वेळी दंड आकारल्या जातो. हा दंड शेतकऱ्यांना वाहनाच्या किरायासोबत द्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनधारक रस्त्यावरील वाहतूक दंडाच्या रकमेसंबधी तोंडी करारनामा शेतकऱ्यासोबत करीत असल्याने सदर दंड शेतकऱ्यांना बसत असते. अलिकडे वरोरा परिसरात कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनास अधिक दंड ठोठाविणे सुरू असल्याचे दिसून येते. श्रमाने पिकविलेल्या कापसाला उत्पादन खर्चा एवढा दर नाही, रोखीने चुकारा नाही, त्यातच वाहतूक दंडाचाही भुर्दंड सहन करावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वाहनाने कापूस विक्रीला नेण्यासाठी वाहतूक दंड
By admin | Updated: December 28, 2016 01:56 IST