डास प्रतिबंधक फवारणी करावी
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींची अर्थव्यवस्था नाजूक झाली. अशा स्थितीत स्वबळावर डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली नाही. त्यामुळे पंचायत समितीने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सुमठाणा-तेलवासा रस्त्याची दुरवस्था
भद्रावती : तालुक्यातील सुमठाना ते तेलवासा हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारित येतो. मात्र, या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
गडचांदूर: माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. याठिकाणी जिल्ह्याबाहेरील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहे. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकर देव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहे. परंतु, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर बंदी आणणे गरजेचे आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
गोंडपिपरी : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी अतिक्रमण केले. काहींना नोटीस बजावण्यात आले. त्यामुळे स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे अजुनही जैसे-थे आहेत. त्यांना बघूण अनेकजण अतिक्रमण करीत आहेत.
रोजगाराअभावी बेरोजगार निराश
ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरती करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.
भारोसा घाटावर पूलाची निर्मिती करा
कोरपना : तालुक्यातील भारोसा घाटावरुन तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पूलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी मुलाची निर्मिती झाल्यास चंद्रपूर, कोरपना , वणी तालुक्यातील गावातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी सोयीचे होईल .तसेच भाविकांना कार्तिक पौर्णिमा व शिवरात्री उत्सवाला भाग घेण्यासाठी सोयीचे होईल. या पुलाच्या माध्यमातून वेळ व आर्थिक बचत होणार असल्याने पूल बांधण्याची मागणी आहे.
नाली उपसाअभावी डासांचा उच्छाद
भद्रावती : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणाम, डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन नाल्याचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
किटाळी येथे बसस्थानकाची मागणी
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या किटाळी मक्ता येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे बसस्थानक बनविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.किटाळी हे गाव चिमूर- कानपा या राज्य महामार्गावर वसले असून स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी बसस्थानक होते. परंतु तीन वर्षापूर्वी अपघातात क्षतीग्रस्त झाले.