चंद्रपूर : सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाण नगर भूमापन मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेस कलम १२६ च्या उपबंधान्वये भूमापन करण्याची तरतूद लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय, राजकोषीय व कायदा हे तीन उद्देश साध्य करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव व वरोरा तालुक्यातील एकार्जूना या गावातील गावठाण भूमापन हद्द सर्वे नंबरच्या सुचीनुसार पडताळणीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.टपाल, पोलीस, विद्युत, स्वच्छता व जनगणना आदी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी, शहरातील रस्ते, घरे व कार्यालय आदी प्रदेश वर्णानात्मक तपशील दर्शविणारे अचुक नकाशे पुरविणे हा प्रशासकीय उद्देश आहे. पाणी पुरवठा ड्रेनेज, ट्रॉमवेज, विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनासाठी परिपूर्ण अशा मोठ्या परिमाणांतील नकाशांची आवश्यकता असते. तर शैक्षणिक संस्था, वैद्यकीय मदत, अग्निशामक उपाय व जकात वसुली या सर्व गोष्टी शहराच्या अचुक नकाशावर अवलंबून असतात. हे नकाशे या मोहिमेत अद्यावत होणार आहेत.जमिनीपासून येणे असलेल्या महसुलाची खात्री करणे आणि भविष्यातील महसुलाचे विकासाकडे लक्ष देणे तसेच सार्वजनिक जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे आणि त्यांची विक्री अथवा चोरून विनियोग होऊ न देणे हा राजकोषीय उद्देश आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करणे व जे योग्य असतील त्यांना पाठिंबा देणे व त्यांचे उत्तम प्रकारे निर्धारीकरण करणे व जे अयोग्य आहे ते काढून टाकणे मिळकत धारकामधील गुंतागुतीचे दावे थांबविणे. खाजगी दावेदार व स्थानिक संस्था किंवा सरकार यांच्यामधील हक्काबाबतच्या शंकाचे निरसन करणे तसेच त्यांच्यामधील वरीलप्रमाणे होणारे संभाव्य दावे थांबविणे हा कायदेशीर उद्देश आहे.जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागामार्फत सन २०११ च्या जनगणने अन्वये २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले १५ गावांची नगर भूमापन योजना लागू करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी, भद्रावती- घोडपेठ, वरोरा- एकार्जुना, चिमूर- वडाळा पैकू, ब्रह्मपुरी- उदापूर, नागभीड- कानपा, सिंदेवाही- लोणवाही, मूल- फिस्कुटी, सावली- व्याहाड खुर्द, गोंडपिपरी- वढोली, पोंभूर्णा- नवेगाव मोरे, बल्लारपूर- पळसगाव, राजुरा- देवाडा, कोरपना- कोरपना व जिवती- पाटण आदी गावांची निवड करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
भूमिअभिलेखची गावठाण नगर भूमापन मोहीम
By admin | Updated: August 9, 2014 01:37 IST