खडसंगी : रोजच्या जेवणात चवीसाठी उपयोगी असलेले टमाटरचे भाव ८० ते १०० रुपये किलो झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी हे भाव परवडण्याजोगे नाही. मात्र टमाटरच्या तुलनेत नित्य उपयोगी पडणारे वाहनामधील पेट्रोलचे दर कमी आहेत. त्यामुळे एकेकाळात पाच रुपये किलो दराने विकल्या जाणारे टमाटर आता घेणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे. ऐन श्रावणात भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील बजेट कोलमडले आहे. तालुक्यातील आठवडी बाजारात फेरफटका मारला असता टमाटर ८० रुपये, मिरची ६० रुपये किलो, कोबी ८० रुपये किलो, कारले ४० ते ५० रुपये पाव अशाप्रकारे सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.तर टमाटर पेट्रोल, डिझेलपेक्षाही महाग झाले आहेत. मुळात मृग नक्षत्र कोरडे गेले, त्यामुळे कोरडा दुष्काळ पडल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जुलै महिन्याच्या मध्यंतरी पावसाने जरी हजेरी लावली तरी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बाहेर गावातून येणाऱ्या भाजीपाल्यांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच सध्या शहरात आवक होणाऱ्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. हे दर किमान महिनाभर टिकून राहतील, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.पालेभाज्याचे दर हे कडधान्यापेक्षाही जास्त झाल्याने कडधान्य खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला असल्याची माहिती दुकानदार देत आहेत. श्रावण महिन्याचा विचार करता मासांहार व्यर्ज असल्याने पर्यायाने भाज्यांचा व्यापार मोठा होता. परंतु याच महिन्यात दर वाढल्याने भाजीपाला खाणे अशक्यच होऊन बसले आहे. (वार्ताहर)
पेट्रोल-डिझेलपेक्षा टमाटर झाले महाग
By admin | Updated: August 6, 2014 23:45 IST