विसापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, विसापूर येथे अभ्यासिकेचे पदाधिकारी, सदस्य व विद्यार्थी मिळून श्रमदानातून शौचालयाची भिंत व अभ्यासिकेच्या परिसरात विद्यार्थ्यांना बसण्याकरिता ओट्याचे बांधकाम केले.
नुकतीच अभ्यासिका नवनिर्मित इमारतीत हलविण्यात आली. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकेचे सदस्य प्रदीप गेडाम यांनी स्वखर्चाने शौचालयाचे बांधकाम केले व उर्वरित बांधकामासाठी स्वतः सर्व सदस्य, पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी आपला वेळ देऊन श्रमदान करून हे कार्य केले. यावेळी स्वतः हातात कवच्या घेऊन भाऊराव तुमडे यांनी कामाला सुरुवात केली. कोणतेच कार्य हे लहानमोठे होत नाही. श्रमदानानेच माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते, असे विद्यार्थ्यांना सांगून त्यांनी श्रमदानासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. या कार्यासाठी अध्यक्ष डॉ. सुनील बुटले, उपाध्यक्ष सुरेश पंदीलवार, सचिव चंद्रकांत पावडे, कोषाध्यक्ष सुभाष भटवलकर, सदस्य मुन्नालाल पुंडे, जनार्दन पाटणकर, बंडू बावणे, मयूर इटनकर, विद्यार्थी कुणाल करमनकर, योगेश तांदूळकर, प्रीतम दिघोरे, महेश बांनकर आदींनी श्रमदान केले.