प्रशासनाची तयारी : वाड्या, वस्त्यांमध्ये कर्मचारी पोहोचणार चंद्रपूर : जिल्ह्यातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सर्वेक्षण शनिवार ४ जुलै रोजी करण्यात येणार असून एकही बालक या सर्वेक्षणातून सुटू नये याची पुरेपुर काळजी शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन विभाग घेणार आहे.शासन निर्देशानुसार ४ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सर्वेक्षण करायचे आहे. समाजातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालक शाळेत दाखल करणे व नियमितपणे शाळेत उपस्थित राहून दर्जेदार शिक्षण घेणे या महत्त्वाच्या उद्देशासाठी जे विद्यार्थी अजूनही शाळाबाह्य आहेत, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा, शासनाचा व शिक्षण हक्क कायद्याचा संकल्प आहे. सदर सर्वेक्षण वाड्या, वस्त्या, तांडे, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, दगडखाणी, विटाभट्टी, हॉटेल, स्थलांतरीत कुटूंबे, भटक्या जमाती, वेशावस्ती, कारखाने, विजनिर्मिती केंद्र वसाहत इत्यादी ठिकाणी करण्याचे नियोजित आहे. या सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)मुलांच्या बोटाला लागणार शाईशनिवार ४ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या दरम्यान शिक्षकांसह सर्व सरकारी कर्मचारी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत. घरोघरी, बाजार, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शेत आदी ठिकाणी हे सर्वेक्षण होणार असून पल्स पोलीओ प्रमाणे विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर ‘त्या’ मूलाला शाळेत दाखल करुन घेतले जाणार आहे.तालुका व गावस्तरावर समित्याशाळाबाह्य बालकांच्या एक दिवसीय सर्वेक्षणासाठी कार्यवाही करण्याकरीता तालुकास्तरावर व गावस्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना शासन निर्णयानुसार सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याकरीता निर्देश देण्यात आले आहे. या सर्वेक्षणाकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
शाळाबाह्य बालकांचे आज सर्वेक्षण
By admin | Updated: July 4, 2015 01:39 IST