चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २६ डिसेंबर २०१४ ला टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. या टपाल तिकीटाचा सादरीकरण समारंभ गुरूवार ४ जुन रोजी चंद्रपुरात आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ६ वाजता चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला स्वर्गीय बाबा आमटे यांचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रसायने व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार नाना शामकुळे, आ. विजय वडेट्टीवार, आ. संजय धोटे, आ. मितेश भांगडीया, आ. कीर्तीकुमार भांगडीया, आ. बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, नागपूर रिजनचे पोस्टमास्तर जनरल चार्ल्स लोबो, जिल्ह्याचे प्रवर अधीक्षक डाकघर आर. रघुपती यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्र शासनाने टपाल तिकीट प्रकाशित करावे, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारशी सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे याबाबत शिफारस करावी यासाठी पत्रव्यहार केला. त्यामुळे १६ मार्च २००९ रोजी तत्कालीन केंद्रीय संचार मंत्री ए. राजा यांना विधानसभेच्या ६३ आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले होते. या पत्रव्यवहराला व पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले आणि केंद्र सरकारच्या डाक विभागाने १६ सप्टेंबर २०१४ रोजी स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या तिकीटाचे गुरूवारी सादरीकरण होणार आहे. शांतिदुताच्या रूपात उपेक्षित वंचितांची सेवा करण्यासाठी आपले अवघे जीवन खर्ची घालणाऱ्या बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मशताब्धी वर्षानिमित्त प्रकाशित टपाल तिकिटाच्या सादरीकरण समारंभाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टपाल तिकीट सादरीकरण समारंभ आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बाबा आमटे यांच्या प्रकाशित टपाल तिकिटाचे आज सादरीकरण
By admin | Updated: June 4, 2015 01:21 IST