चंद्रपूर : महानगरपालिकेतील भोंगळ कारभार व कचरा घोटाळ्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी सुरू केलेले उपोषण रविवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. दोन दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलन करून गोळा केलेली रक्कम उद्या २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयुक्तांकडे सुपूर्द करून जनतेला अधिकच्या करापासून मुक्त करून भोंगळ कारभार थांबविण्याची मागणी केली जाणार आहे.सध्या महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. शहरात जिल्ह्याचे पालकमंत्री व केंद्रीय मंत्री वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीने त्यांनाही निवेदन देऊन मनपातील मनमानी कारभार थांबविण्याची मागणी केली. मात्र दोन्ही मंत्री महोदयांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे नंदू नागरकर यांनी म्हटले आहे. प्रति दिवस १०० टन कचरा उचलून डम्पींग यार्डवर टाकण्याचे प्रति महिना २१ लाख रुपयांचे कंत्राट सुरू असताना पुन्हा प्रति दिवस १०० टन कचरा उचलण्याचे प्रति महिना ५४ लाखांचे कंत्राट त्याच कंपनीला देण्यात आले. नागरिकांच्या पैशाची ही उधळपट्टी असून ती तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर यांनी गांधी चौकात १८ मार्चपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यापूर्वी मुंडण, मौनव्रत हे आंदोलनही केले. दरम्यान, शुक्रवारी गोल बाजार, आंबेडकर चौक, गांधी चौक, मिलन चौक, सराफा लाईन परिसरात भिक मांगो आंदोलन करण्यात आले. भिक मागून १ हजार ५९ रुपये गोळा करण्यात आले. ही रक्कम उद्या सोमवारी आयुक्तांकडे सोपवून नागरिकांवर अकारण कराचा भुर्दंड लादू नका, अशी मागणी करण्यात येणार आहे. कचरा संकलनाचे नवीन कंत्राटही रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आज माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनीही उपोषण मंडपाला भेट देऊन नागरकर यांची विचारपूस केली. (शहर प्रतिनिधी)
आज आयुक्तांकडे सोपविणार भिकेची रक्कम
By admin | Updated: March 23, 2015 01:10 IST