गोंडपिपरी : वाघांची मुबलक संख्या, मोठ्या प्रमाणावर असलेल्या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी शासनाने कन्हाळगाव अभयारण्याची निर्मिती केली. पण येथील वाघांची आता पुरती झोप उडाली आहे. याला कारणीभूत ठरताहेत येथील रेतीतस्कर. गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या अधिवास क्षेत्रातील नाल्यातून खुलेआम रेतीतस्करी सुरू आहे. या प्रकारामुळे वाघांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वरक्षित जंगलात रात्रीबेरात्री तस्करांचा गोंगाट सुरू असताना वन विभाग मात्र झोपेत आहे. तालुका प्रशासनाने तस्करांना अप्रत्यक्षपणे जंगल मोकळे करून दिल्याचे चित्र आहे. गोंडपिपरी तालुका वनवैभवाने संपन्न आहे. मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे. ही खनिज संपत्ती लुटण्यासाठी तस्करांचे मोठे जाळे तालुक्यात आहे. गोंडपिपरी,धाबा, सुकवासी येथे मार्गाचे काम सुरू आहे. या कामात अनेक ठिकाणी पाईपलाईनची कामे सुरू आहेत. यासाठी लागणारी रेती तस्कर लगतच्या चिवंडा जंगलातील नाल्यातून उपसत आहेत. अगदी कमी वेळात रेती उपलब्ध होत असल्याने हे कंत्राटदारदेखील नाल्यातील रेतीला पसंती देत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले आहे. कन्हाळगाव अभयारण्यातील चिवंडा जंगल वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे. या चिवंडा जंगलातील नाल्यातून रात्री मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी सुरू आहे. रात्रभर वाहनांचा आवाज ऐकू येत असल्याने येथील वाघांची पुरती झोप उडाली आहे. हा भाग सध्या वन विकास महामंडळात मोडतो. या तस्करीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता मोठमोठ्या योजना करण्यात येत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक प्रशासनामुळे वन्यजीवांपुढे नवीनच संकट उभे ठाकले आहे.