अस्वलाचे पिल्लू ठार : खडसंगी परिसरातील घटनाचंद्रपूर: वाघ व अस्वलीमध्ये झालेल्या संघर्षात अस्वलीच्या पिलाचा मृत्यू झाला तर अस्वल गंभीररित्या जखमी झाली. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात येणाऱ्या खडसंगी क क्ष क्रमांक ५४ मध्ये बुधवारी रात्री घडली. खडसंगी क क्ष क्रमांक ५४ मधील एका जलाशयात वाघ व अस्वल आपल्या पिलासह पाणी पिण्यासाठी एकाचवेळी आले आणि वाघ व अस्वलीत संघर्ष सुरू झाला. यात वाघाने केलेल्या हल्ल्यात अस्वलीचे पिल्लू मृत्युमुखी पडले, तर अस्वल गंभीर जखमी झाली. गुरूवारी काही वन कर्मचाऱ्यांना जलाशयाजवळ मृत पिलासह अस्वल दिसली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या संदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, ताबोडा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा (बफर) चे उपसंचालक जी.पी.नरवणे, सहाय्यक वन संरक्षक आर.के.सोरते, आर.आर.कुलकर्णी, मानद वन्यजीव सदस्य बंडू धोतरे, पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे घटनास्थळी पोहचले. यावेळी क्षेत्रिय कर्मचाऱ्यांसह ईको-प्रोच्या रेस्क्यू दलाने तात्काळ जखमी अस्वलीला जाळ्यात पकडून पिंजऱ्यात कैद केले. अस्वलीच्या मागील दोनही पायांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जखमी अस्वलीला नागपूर येथे रवाना करण्यात आले. बुधवारी रात्री घटनास्थळ परिसरात असलेल्या मचानीवर उपस्थित असलेल्या वन कर्मचाऱ्यांना जलाशयाजवळ वाघ व अस्वलीच्या ओरडण्याचा आवाज आला होता. सकाळी त्याच ठिकाणी जखमी अस्वल व तिचे मृत पिल्लू आढळून आले. ताडोबाचे अधिकारी घटनेचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
वाघ-अस्वलीत संघर्ष
By admin | Updated: May 13, 2016 00:58 IST