गोवरी : रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्या अंगावरील दागदागिने मौल्यवान वस्तू व खिशातील पैसा जबरदस्तीने चोरणारी टोळी सक्रीय झाल्याने खामोना-पाचगाव हा मार्ग सायंकाळ झाल्यानंतर निर्मनुष्य होत असल्याने या मार्गावर चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे.राजुरा तालुक्यातील खामोना-अहेरी-पाचगाव या मार्गावर गेल्या आठ-दहा दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू व पैसा जबरदस्तीने हिसकावत असल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. विश्वास चौधरी हे राजुरा येथून खामोना-अहेरी मार्गाने पाचगाव येथे सासुरवाडीला रात्रीच्या सुमारास दुचाकीने जात असताना त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडाओरडा करताच तसेच समोरून एक चारचाकी वाहन आल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला. त्यांनी ही घटना गावात जाऊन सांगितली. त्यानंतर सुब्बना रेड्डी हे दुचाकीने पाचगावला जात असताना दुचाकीवर असलेल्या चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र ते चोरट्यांच्या हाती लागले नसल्याने बचावले. त्यामुळे या मार्गावर दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
डोळ्यात मिरची पावडर फेकून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न
By admin | Updated: October 14, 2015 01:31 IST