कॉंग्रेसप्रणीत माजी सरपंच रवींद्र मरपल्लीवार गटाचे सहा सदस्य निवडून आले असल्याने निर्विवाद सत्ता स्थापन करणार आहेत. विरोधी गटाचे तीन सदस्य आहेत. निवडणुकीनंतर आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कुणी सर्वसाधारण तर कुणी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित व्हावे, अशी मनोमन इच्छा व्यक्त करीत होते. सोडतीत सर्वसाधारण महिलेकरिता सरपंचपद आरक्षित झाल्याने पुरुष मंडळींचा पुरता हिरमोड झाला. आता उपसरपंचपदावर समाधान मानावे लागेल.
काँग्रेस गटातून निवडून आलेल्या रोशना प्रवीण लोडे यांचे वडील हरिदास वाकुडकर यांनी येथील ग्रामपंचायतीवर २० वर्षांपर्यंत अंमल केला. यामुळे लोडे यांची वर्णी लागेल, असा अंदाज आहे. निर्मला अर्जुनकर यासुध्दा दावेदार आहेत. हेमा सिडाम या तिसऱ्या दावेदार आहेत. गत पंचवार्षिकमध्येही सिडाम सरपंचपदाच्या दावेदार होत्या. परंतु दुसऱ्या महिलेची वर्णी लागल्याने त्यांचे पद हुकले. आता या तीनपैकी कोणत्या महिलेच्या गळ्यात सरपंचपदाची माळ टाकायची, याचा निर्णय आघाडीप्रमुख रवींद्र मरपल्लीवार हे घेणार आहे. ते कोणाला संधी देता, याकडे लक्ष ग्रामस्थांच्या नजरा लागलेल्या आहेत.