लाखोंचे सागवान जप्त : अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणलेकोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प बल्लारपूरअंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील कुडेसावली बिटातील कक्ष क्र. ८ मध्ये अवैध वृक्षतोड करणाऱ्या तिघांना वन कर्मचाऱ्यांनी अटक केली. राम बट्टे, गौतम गेडाम व अशोक मावलीकर अशी तस्करांची नावे आहे. त्यांना रविवारी सायंकाळी जंगलात गस्त करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी सागवान लाकडांची वाहतूक करताना रंगेहात पकडून अटक केली. आरोपींना गोंडपिपरी न्यायालयात हजर केले असता जामिननाकारून आरोपींची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली.वनविकास महामंडळाच्या झरण-कन्हारगाव, धाबा व तोहोगाव वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून वन अधिकाऱ्यांना या तस्करीबाबत अवगत केले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली. वन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद देवून वनसंरक्षणाकडे लक्ष केंद्रीत करण्याबाबत बजावले. ६ डिसेंबरच्या सायंकाळी कुडेसावली वनक्षेत्रात काही सागवान चोर अवैध वृक्षतोड करीत असल्याचा सुगावा वनरक्षक यू. एन. साबळे, प्रशांत मलोडे, वनपाल विपूल आत्राम यांना लागला. त्यांनी लगेच जंगलगाकडे धाव घेऊन रामभाऊ बट्टे, गौतम गेडाम व अशोक मावलीकर यांना सागवान लाकडासह अटक केली. सदर गुन्हेगार मागील अनेक दिवसापासून वृक्षतोड करीत असल्याची माहिती वनअधिकारी प्रफुल्ल निकोडे यांना होती. ते आरोपीच्या मागावर होते. सदर आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणी या तिघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये कलम २६(१) ई.एफ. ४१ नुसार अजामिनपात्र गुन्हा दाखल केला. आरोपींना गोंडपिपरी न्यायालयात हजर केले असता त्यांची चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.जंगलात बेकायदा प्रवेश करून सागवान बहुमूल्य वृक्षांची अवैध कटाई करणे आरोपींना महागात पडले. या घटनेमुळे कोठारी, कुडेसावली, तोहोगाव, धाबा आदी गावातील लाकुड तस्करांत धाबे दणाणले आहे. अटकेच्या कारवाईनंतर वनाधिकारी निकोडे यांनी आरोपींच्या कुडेसावली येथील राहत्या घरांवर वनकर्मचाऱ्यांसह धाडी घालून लाखो रुपयांचे सागवान जप्त केले. या घटनेचा पुढील तपास कन्हारगावचे वनाधिकारी निकोडे, वनविभागीय व्यवस्थापक एम.एस. फारूखी, सहा. व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ व सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या कारवाईमुळे काही काळ तरी सागवान तोड थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
अवैध वृक्षतोड करणाऱ्या तिघांना अटक
By admin | Updated: December 14, 2015 00:53 IST