भद्रावती : नागपंचमी पर्वावर हजारो भाविकांनी भद्रनागस्वामींचे दर्शन घेतले. भद्रनागस्वामींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेव व भद्रशेष महाराज की जय...च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. येथे आयोजीत एक दिवसीय यात्रेत रात्री जागृती भजन झाले. मूर्तीला शेंदुर लावण्याच्या दृष्टीने मंदिराचा गाभारा भाविकांसाठी खुला करून देण्यात आला. पहाटे ५ वाजताच्या दरम्यान भद्रनागस्वामींची महापुजा तहसीलदार सचिन कुमावत व अंजली कुमावत यांच्या हस्ते करण्यात आली. शैलेश जोशी महाराज यांनी विधिवत पुजा सांगितली. याप्रसंगी पूजेला अविनाश सिध्दमशेट्टीवार, अर्चना सिध्दमशेट्टीवार, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश मिलमिले, सचिव मधुकर सातपुते, कोषाध्यक्ष प्रकाश मायट्टीवार, सहसचिव योगेश पांडे, सदस्य निलकंठ एकरे, राजेश पोडे, मनोहर सहारे उपस्थित होते.भर पावसातही भाविकांनी दर्शन घेतले. मंडळातर्फे मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. ठाणेदार निकम यांच्या मार्गदर्शनात सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. चार ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात आले होते. १७ पोलीस अधिकारी व ११० कर्मचारी तैनात केले होते. पोलीस विभागातून सतत वायरलेसद्वारे सुचना देण्यात येत होत्या. श्वानपथकाद्वारे संपुर्ण परिसराचे निरिक्षण करण्यात आले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भद्रनागस्वामींचे दर्शन घेतले. भद्रनागस्वामींचे दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील संसर, पांढुर्णा येथीलही भाविक मोठ्या प्रमाणात होते. येथील नागरिक सचिन उपगन्लावार, सचिन कुटेमाटे, संजय उपरे, अतुल कोल्हे, जयंता शिंदे, अक्षय लोहे व अन्य सकाळपासूनच मंदिरात उपस्थित होते. संदिप भदान यांनी प्रसाद वितरीत केले. (तालुका प्रतिनिधी)
हजारो भाविकांनी घेतले भद्रनागस्वामींचे दर्शन
By admin | Updated: August 9, 2016 00:49 IST