शाळा बंद : रस्त्याच्या कडेला केले ध्वजारोहण
राजू गेडाम
मूल : देशाविषयीचे प्रेम स्वयंप्रेरणेने जागृत होत असते. असाच प्रसंग नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड नं. १४ मध्ये दिसून आला. सध्या कोरोना काळ असल्याने लहान मुलांच्या शाळा बंद आहेत. प्रजासत्ताक दिनी आपल्याला शाळेत जाऊन तिरंगा फडकविण्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून काही चिमुकल्या मुलींनी रस्त्याच्या कडेला बांबूच्या साह्याने तिरंगा राष्ट्रध्वज लावून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत गायिले. त्यांचे हे देशप्रेम पाहून अनेक जण भारावले.
कोविड १९ च्या प्रकोपामुळे देशात सर्वत्र शाळा बंद असल्याने त्यांना गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण करता येणार नाही. ही खंत सतत बोचत असल्याने मूल येथील वॉर्ड क्रमांक १४ मधील रहिवासी अनघा सुनील कांमडी (वर्ग ३), सान्वी हेमंत कन्नाके (वर्ग ४ ), संस्कार जितेंद्र बल्की (वर्ग ३), झोया शेख (वर्ग ५ ), शिवांश दीपक मडावी (वर्ग २), सर्व विद्यार्थी सेन्ट आनेस कान्वेंट मूल, तर बल्लारपूर पब्लिक स्कूलची आराध्या गुंडेवार (वर्ग ३ ) या चिमुकल्यांनी वॉर्डातील रस्त्याच्या कडेला एका बांबूच्या साहाय्याने तिरंगा राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
त्यानंतर राष्ट्रगीत गाऊन गणराज्य दिन साजरा केला. घरी राहून कंटाळा आला, शाळेत जायला मिळत नसून राष्ट्रीय उत्सवात, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता येत नसल्याची खंत या चिमुकल्यांनी व्यक्त केली. चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेला देशभक्तीचा हा प्रत्यय अनेकांना भारावून टाकणारा ठरला.