सावली : येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील योगी नारायण बाबा मठालगत सर्व्हे क्र. ७९८ वरील मोकळ्या मैदानावर क्रीडांगण मंजूर करावे, या मागणीसाठी नागरिक व युवक-युवतींनी सोमवारी (दि. १७) वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. या बंददरम्यान शहरात कुठेही अनुचित घटना घडली नाही.
शहरातील योगी नारायण बाबा मठालगतच्या मोकळ्या मैदानाचा वापर पोलिस व सैन्यात प्रवेश घेणारे इच्छुक युवक-युवती गेल्या पाच वर्षांपासून क्रीडांगण म्हणून करत आहेत. या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा, पोलिस विभागाची सद्भावना स्पर्धा, पालकमंत्री व नगर पंचायत चषक, सावली प्रीमिअर लीग तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरात सध्या कुठेही अधिकृत क्रीडांगण नाही. त्यामुळे या मैदानाचा उपयोग मार्निंग वाॅक, पोलिस व सैन्य दलात इच्छुक युवक-युवती सरावासाठी करत आहेत. या जागेची स्वच्छता करून मैदानाचे स्वरूप देण्यात युवक-युवतींनी परिश्रम घेतले. त्यामुळे त्याच ठिकाणी क्रीडांगण तयार व्हावे, अशी मागणी करत वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढला व कडकडीत बंद पाळला.
नेमके घडले काय?सावली तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांनी याच मोकळ्या मैदानावर शासनाने आदिवासी मुले व मुलींसाठी वसतिगृह उभारावे, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. या मागणीची दखल घेत विभागीय वन अधिकारी चंद्रपूर यांनी संबंधित जागेवर क्रीडांगण निर्माण करण्यास आदिवासी समुदायाचा विरोध असल्याचे पत्र जारी केले. त्यामुळे ही जागा रद्द होणार असल्याचे कळताच आज सावलीत बंद पाळण्यात आला.
प्रशासन जागेची पाहणी करणारक्रीडांगणासाठी जागा द्यावी, या मागणीसाठी सावली येथील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली. प्रशासनाकडून जागेची पाहणी करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
"सावली शहर पेसा अंतर्गत येत नाही. योगी नारायण बाबा मंदिराजवळील संबंधित जागा क्रीडांगणासाठी राखीव राहावी, यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे."
- प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर