जिल्हाधिकाऱ्यांचा निर्वाळा : आरोपकर्त्यांना प्रशासनाची चपराकचंद्रपूर : विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेतून चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात मद्यविक्री झालीच नाही, कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला तसे निर्देेश आधीच देण्यात आले होते, अशी स्पष्टोक्ती शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या या निर्वाळ्यामुळे डेक्कन ओडीसीतून दारूविक्री झाली, असे म्हणत आकांततांडव करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.गेल्या तीन दिवसांपासून डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेमध्ये असलेल्या बारवरून वातावरण तापले आहे. बुधवारी ११ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता डेक्कन ओडीसी पंचतारांकित रेल्वे चंद्रपूरला आली होती. या रेल्वेमध्ये भरपूर मद्य आणि बिअर बार असून त्याचा वापर झाल्याचा आरोप झाला होता. दारूबंदी विरोधकांच्या पुढाऱ्यांनी यात आघाडी घेतली होती. काही माध्यमांनीही त्यात सूर मिळविला होता. दरम्यान या संदर्भातील तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने डेक्कन ओडीसीच्या रेकॉर्डची तपासणी केली होती. त्यात मद्याचा वापर झाला नसल्याचे त्यांना निदर्शनास आले होते. तसा अहवालही त्यांनी वरीष्ठांना दिला होता. मात्र त्या तपासणीवरही बराच आकांततांडव माजविण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी या प्रकरणात हस्तक्षेप करीत सायंकाळी आपल्या स्वाक्षरीनिशी प्रसिद्धीपत्रक काढले. या पंचतारांकित रेल्वेमध्ये जिल्हाधिकारी मुंबई शहर (राज्य उत्पादन शुल्क) विभागाकडून परवानाकक्ष अनुज्ञप्ती मंजूर आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने जिल्ह्यात रेल्वे असताना मद्याचा पुरवठा पर्यटकांना न करण्याबाबत एमटीडीसीला निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याच्या सीमेमध्ये मद्याचा साठा सिलबंद ठेवण्यात आला होता. दारूबंदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली होती, त्यामुळे डेक्कन ओडीसी रेल्वेगाडीतून मद्याचा पुरवठा झालाच नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दारूबंदी क्षेत्रात डेक्कन ओडिशीतून मद्य विक्री नाहीच
By admin | Updated: May 15, 2016 00:35 IST