सुधीर मुनगंटीवार : वरोरा जिल्ह्यासाठी निवेदन वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जिल्ह्याची मागणी उफाळून आली आहे. त्याकरिता जनआंदोलनदेखील पेटले आहे. वरोरा तालुक्यातील एका शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले असता त्यांनी राज्यात तुर्तास नवीन जिल्हा निर्मिती करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले. चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही या तालुक्यांच्या गावांना काही इतर तालुके जोडून नवीन जिल्हा निर्मिती करण्याबाबत गेल्या १० दिवसांत जनआंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद पाहून वरोऱ्यातील नागरिकांनी आंदोलन न करता पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांची भेट घेतली. वरोरा जिल्हा निर्माण करावा, असे निवेदन सादर केले. चिमूर, नागभीड व ब्रह्मपुरी हे जिल्हा निर्मितीकरिता कसे योग्य आहेत, हे पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर वरोरा येथील शिष्टमंडळाने वरोरा तालुकादेखील नवीन जिल्ह्यासाठी उपयुक्त असल्याचा युक्तिवाद ना. मुनगंटीवार यांच्या समक्ष केला. इतर सर्व तालुक्यांच्या तुलनेत नवीन जिल्ह्यासाठी वरोरा तालुका परिपूर्ण आणि सक्षम आहे. त्यामुळे वरोरा जिल्हा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात प्रवीण धनवलकर, गिरीष जयस्वाल, डॉ. भगवान गायकवाड, विलास टिपले, छोटूभाई शेख यांच्यासह व्यापारी वर्ग उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)
नवीन जिल्हानिर्मिती तूर्तास नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:06 IST