गावकऱ्यात संताप : तहसीलदारांकडून पाठराखणकोठारी : कोठारीपासून १० किमी अंतरावर असलेल्या मौजा परसोडी येथील सरकारी स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेत्यावर एक वर्षापासून गावकरी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी करीत आहे. मात्र तहसीलदारच दुकानदाराची पाठराखण करीत असल्याने गावकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार सुरेंद्र मत्ते गावकऱ्यांना धान्य वितरणात व केरोसीन वाटपात गैरप्रकार करीत असून त्यापासून गावकरी त्रस्त झाले. दुकानदार गावकऱ्यांचे केरोसिन अवैधरीत्या ट्रॅक्टरने नेत असताना त्यास तंटामुक्त समितीने पकडले. त्यावरील प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. तरीही त्यांच्याकडेच पुन्हा केरोसिन वितरणाचे काम दिल्याने गावकरी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सरकारी धान्य वितरण करताना शासनाच्या दरापेक्षा जास्त आकारणी करून गावकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. दुकानासमोर भावफलक व साठा कधीही लावला जात नाही. सदर दुकानदार २० ते २५ वर्षांपासून राजकारणाच्या माध्यमातून लोकांना धमकावत असतो. ग्रा.पं. मध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य पदे दोघेही पती-पत्नी भूषवीत असतात. त्यामुळे गावकऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करीत असतो. त्यामुळे गावकऱ्यात नेहमी भीतिदायक वातावरण असते. अनेक बीपीएलकार्डधारकांना एपीएल कार्डात रूपांतरित करून त्यांना हक्कापासून वंचित करण्याचे षड्यंत्र ते करीत असतात. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे तक्रार करून कारवाईची मागणी केली. मात्र तहसील कार्यालयातूनच त्याची पाठराखण करून चौकशी, पंचनामे व बयाणाच्या नावाखाली चालढकल सुरू आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई शून्य आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांनी या प्रकाराबाबत तहसीलदार यांना वेळोवेळी चौकशी अहवाल सादर करण्यास बजावले व स्वयंस्पष्ट अहवाल मागविला आहे.या प्रकाराची तक्रार राजुरा विधानसभा सदस्य आमदार संजय धोटे यांना गावकऱ्यांनी शपथपत्र दाखल करून केली व दुकानदारावर कारवाईची मागणी केली. धान्य दुकानदारावर कडक कारवाई करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन देणारे आमदार कारवाई करण्यासाठी पुढे का सरसावले नाही, असा सवाल गावकरी करीत आहेत. दुकानदाराच्या गैरप्रकाराची व धान्य, केरोसिन अफरातफरीची आपबिती तहसिलदार, पुरवठा अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व आमदारांना सांगितले असता केवळ चौकशीचा फार्स पुढे करून गावकऱ्यांचा भ्रमनिरास केला जात आहे. त्यामुळे प्रशासनातील विश्वासपात्र अधिकारी व कार्यालयातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया सुरेंद्र चोथले, विश्वनाथ बोभाटे, अविनाश आगलावे, उमेश कातरकर व तेजराज लिंगे यांनी नोंदविली आहे. (वार्ताहर)
स्वस्त धान्य दुकानदारावर वर्षभरापासून कारवाई नाही
By admin | Updated: December 13, 2015 00:54 IST