घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : बाई ,आई आहे. माई आहे. ताई आहे. तिची अनंत रूपे आहेत. हे आपण जाणून घेतले पाहिजे. या बाईला घडवायला विधात्याने ओव्हर टाईम घेतला असावा, असे मार्मिक विचार सुप्रसिद्ध समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.सोमवारी नागभीड येथे एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. तेव्हा लोकमतने त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयावर बातचित केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, बाईच्या खांद्यावरच देश उभा आहे. माय लेकरांसाठीच जगते. मात्र सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहेत. असे असले तरी प्रत्येक घटस्फोटाला पुरूषच जबाबदार असतात, अशातला भाग नाही.सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. सिंधूताईंनी सांगितले की आज मी चालवित असलेल्या गोरक्षण केंद्रात ३५० गायी आहेत. त्यासुद्धा भाकड आहेत. आज मी चार जिल्ह्यात संस्था चालवीत आहे. आजवर मी हजारो मुले घडविली आहेत. मला २८२ जावई आहेत. मी घडविलेल्या मुलांपैकी अनेकजण उच्च पदांवर कार्यरत आहेत. ४९ सुना आहेत. बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीवर मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की आता संस्कारच उरले नाहीत, असे वाटत आहे. पूर्वी संघर्ष होता. आता तो संघर्षच राहिला नाही. पालकही आपली जबाबदारी झटकत आहेत. सर्वच मोबाईलमध्ये हरवून गेले आहेत. प्रत्येक महिलेने अंगभर कपडे घालायलाच पाहिजे. बाई आई पाहिजे मादी नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बोलताना सिंधूताईं म्हणाल्या, अगदी सुरूवातीच्या काळात राष्ट्रसंतांच्या भजनावरच मला भीक मिळत होती. म्हणूनच येथवर आले. एवढेच नाही तर मी स्मशानातील चितेवर जळत असलेले अन्न खाल्ले आहे, असेही त्या यावेळी लोकमतशी बोलताना म्हणाल्या.
स्त्रीची अनंत रुपे आहेत, ती जाणून घ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST
सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले. अनेकदा कागदपत्रे सादर केली. पण त्याचा उपयोग झाला नाही.
स्त्रीची अनंत रुपे आहेत, ती जाणून घ्या !
ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : लोकमतशी बातचित