भाजपाचे आंदोलन : डॉक्टरवर कारवाईची मागणी
चंद्रपूर : डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त असलेल्या १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री चांगलाच तणाव निर्माण झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या आप्तांनी केला. दरम्यान, भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना घटनेची माहिती मिळताच, ते कार्यकर्त्यांसह रुग्णालयात पोहोचले. कार्यकर्त्यांनी रुग्णालयीन व्यवस्थेविरुद्ध नारेबाजी करून संबंधित डॉक्टरविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. रविवारी दिवसभर भाजपाच्यावतीने रुग्णालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. हर्षल सदाशिव गोरणवार (१३) असे मृत मुलाचे नाव असून तो पोंभुर्णा येथील रहिवासी आहे. त्याला डेंग्यूचा आजार जडल्याने त्याच्यावर काही दिवस पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने १७ मे रोजी त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. येथे उपचार सुरू असताना त्याच दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला, असा आरोप मृत हर्षलच्या आई-वडिलांनी केला. याबाबत रात्रीच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर आमदार मुनगंटीवार आपल्या कार्यकर्त्यांसह तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचले. तेथे त्यांनी चौकशी केली. याप्रकरणाची त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी करण्यात येऊन संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील अव्यवस्थेविरुद्ध नारेबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित घटना घडू नये यासाठी रुग्णालयात पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान रविवारी दिवसभर भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात धरणे आंदोलन करून रुग्णालयीन व्यवस्थेचा निषेध केला. यावेळी भाजपाचे महासचिव राजेंद्र गांधी, किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद संतोष कुमरे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)