चंद्रपूर : चारचाकी वाहनातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच लाख रुपयांच्या विदेशी दारूसह दहा लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली. आकाश राजू हरणे (३०, रा. इंदिरानगर, वर्धा), सौरभ मदन कुथारकर (२७, इंदिरानगर, वर्धा), पवन प्रल्हाद धुडे (३१, रा. पिपरी) अशीसे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर परिसरात स्विफ्ट वाहनाला थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी पाच लाख ४ हजार रुपये किमतीच्या ३५ पेट्या ऑफिसर्स चॉईस व वाहन असा एकूण दहा लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गदादे, हवालदार संजय आतकुलवार, अमजद खान, कुंदनसिंग बावरी, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार यांनी केली.