घुग्घुस : नगर परिषदेच्या घोषणेनंतर गुरुवारी नगर परिषदेचा प्रथम प्रशासक म्हणून तहसीलदार नीलेश गौड यांनी नगर परिषदेचा कारभार स्वीकारला. यावेळी घुग्घुस गावाच्या विकासाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे प्रशासक गौड यांनी यावेळी सांगितले.
३१ डिसेंबरला घुग्घुस नगर परिषदेच्या घोषणानेनंतर सातव्या दिवशी नगर परिषदेचे पहिले प्रशासक म्हणून ग्रामसेवकाकडून तहसीलदार नीलेश गौड यांनी दुपारी पदभार स्वीकारला. सर्व महत्वाचे रजिस्टर्ड ताब्यात घेतले तथा ग्रामपंचायतच्या सर्व बँक मॅनेजर यांना पुढील आदेशापर्यत सर्व खाते गोठविण्यासंदर्भात पत्र दिले.
प्रशासक असेपर्यत गावाच्या विकासासाठी कामे करण्याचा मनोदय व्यक्त केला. नगर परिषदेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण आठ ते नऊ महिने लागणार आहे. या दरम्यान प्रशासकीय रचना, प्रभार रचना सारख्या अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतील. सध्या ग्रामपंचायतचे ६० कर्मचारी असून प्रत्येक कर्मचाऱ्याला सोपविलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली की नाही, याची समीक्षा करण्यात येईल. ग्रामपंचायतऐवजी नगर परिषद घुग्घुसचे बोर्ड लावण्यात येईल.