सोई-सुविधा वाढल्या : वाचकांची संख्याही वाढली वसंत खेडेकर बल्लारपूर जगता कुठे काय चालले आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहचविणाचे साधन म्हणून वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. राजे- रजवाडे यांच्या काळात गावात दवंडी पिटली जात असे. इग्रजांच्या काळातही ती पिटली जाई. या सोबतच वर्तमानपत्र काढून दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत नेण्याचे कामही त्यांनी केले. इंग्रजांनी वर्तमानपत्राची सुरुवात भारतात केली, असे म्हटले जाते. त्यानंतर भारतीय भाषांमध्ये वर्तमानपत्र निघू लागलेत. याबाबत बंगाली भाषा सर्वात पुढे राहिली. त्या पाठोपाठ हिंदी, सोबतच इतरही भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित होऊ लागले. मराठी भाषेत पहिले वर्तमानपत्र स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे ६ जानेवारीला काढले. त्यामुळे ६ जानेवारीला मराठी मुलुखात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो. जांभेकर यांनी दर्पण मराठी सोबत इंग्रजीत ही काढले होते. इंग्रजी भाषा त्याकाळी फार कमी लोकांना कळायची. त्यामुळे, भारतीय भाषांमध्ये वर्तमानपत्र काढणे गरजेचे होते. परंतु इंग्रजांना भारतीय लोकांचा आवाज व समस्या या कळावेत, या उद्देशाने बरेचजण आपापल्या भाषेसोबत इंग्रजीतही वर्तमान पत्र काढायचे. त्यासाठी, बहुतेक पत्रकारांचा उद्देश लोकजागृती, लोकांच्या समस्यांना, प्रश्नांना वाचा फोडणे हे होते. पूर्वी, वर्तमानपत्रांची संख्या खूपच कमी होती. वाढत जाऊन ती या घडीला कितीतरी मोठी झाली आहे. इलेक्ट्रानिक मिडीया आल्यानंतरही मुद्रण प्रकारातील वर्तमानपत्र कमी झाले नाहीत. उलट त्यात सातत्याने वाढच होत आहे. पूर्वीची पत्रकारिता, वर्तमानपत्र, मुद्रण व बातम्या छापण्याचा आणि पत्रकाराने कार्यालयांकडे बातम्या पाठविण्याचा प्रकार यामध्ये बराच बदल झालेला आहे. आपण याबाबत नागपूर विभागापुरतेच बोलू! ५०-५५ वर्षापूर्वी, नागपूर विभागात प्रादेशिक वर्तमानपत्र मराठी तीन, हिंदी दोन, इंग्रजी दोन एवढीच निघायची! नागपूर, पूर्वी मध्यप्रदेशात असल्याने या भागात मराठी एवढाच हिंदी भाषेचा प्रभाव होता. त्यांनतर मुंबई प्रांत व आता महाराष्ट्रात असे राज्य झाले. आज, रात्री १० - ११ वाजताही शहरात व गावात मोठी घटना घडली की दुसऱ्या दिवशी, त्या घटनेची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह वाचायला मिळते. त्याचे कारण, नवीन प्रसार तंत्रज्ञान. ५०-६० वर्षापूर्वी मात्र आज या क्षेत्रात जे बघतो व अनुभवतो त्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आज घटना घडली की, त्याची बातमी बनवून नागपूरला तत्काळ पाठविण्याकरिता आजच्या एवढे सहज सोपे साधनच नव्हते. गावात फोनची संख्या मर्यादीत होती. नागपूरला कुणा गावावरुन फोनवर बोलायचे म्हणजे फोन एक्सचेंजवर नंबर बुक करा आणि फोन लागण्याकरिता आपला नंबर कधी लागतो, याची फोन जवळ बसून पाऊण एक तास वाट बघत बसा. नंबर आलाच, बोलणे सुरु झाले की फोन मध्येच कधी बंद होणार याचा भरोसा नसायचा. परत एक तास वाट बघत बसा. दुसरी सोय होती पोस्टातील टेलिप्रिंटरची! टेलिप्रिंटरने नागपूरला बातमी पाठविली जाई. त्याकरिता, टेलिप्रिंटर आपरेटरला, बातमी लवकर पाठवा अशी विनंती केली जाई. त्याने मानले तर ठीक! नाही तर- बोंबला! दुसरा मार्ग होता बसने हातोहाती बातम्याचा लिफाफा पाठविण्याचा. बस स्टँडवर जाऊन, नागपूरला कुणी ओळखीचा जातो का ते बघा, नागपूरच्या बसस्थानकावर वर्तमान पत्राच्या पेट्या असतात. त्यात लिफाफा टाकण्याची विनंती करा, खूपच अर्जंट असेल (जाहिरात वगैरे) तर त्याला अधिकचे पैसे देऊन थेट कार्यालयातच नेऊन द्या, असे नम्रतेने सांगा अशा कसरती कराव्या लागत. सभा संमेलन वा इतर रुटीन बातम्या असल्या की त्या पोस्टाने नागपूरला पाठविले जाई. फोटोबाबत बोलायलाच नको! फोटोग्रार फोटो आरामाने देई. नागपूर कार्यालयात ते पाठविले की, त्या फोटोचा लाकडी ब्लॉक बनविला जाई. त्यावर खर्च आणि प्रक्रियाही लांब! त्यामुळे फोटो फारच कमी येई. उदाहरणच द्यायचे झाल्यास तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद वा पंतप्रधान पं. नेहरु यांचे देश विदेशांमध्ये कोणते मोठे कार्यक्रम झाले की त्या बातमी सोबत त्यांचे ठरलेले पासपोर्ट आकाराचे फोटो येत. कार्यक्रमाचे विस्तृत फोटो बातमीच्या दोन तीन दिवसांनी येत असे. दळणवळणाची आजच्या एवढी रेलचेल नव्हती. त्यामुळे नागपूरची वर्तमानपत्र त्या दिवशी दुपारी २ वाजता नंतर वाचकांच्या हाती पडे! आता तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की पत्रकार घरबसल्या बातमी फोटोसह आपल्या कार्यालयात पाठवतो. फॅक्स आले,गेले. ई-मेल करीत दूर जाव ेलागत असे. आता मोबाईलवरच ई-मेल आले आहेत. अशी बदलत गेली पत्रकारिता आणि वर्तमानपत्रे. अधिकाधिक बातम्या प्रकाशित व्हाव्यात म्हणून मुख्य आवृत्ती सोबत जिल्हा आवृत्या निघू लागल्या आहेत. त्यामुळे लहान लहान गावांनाही बातम्यांमध्ये स्थान मिळू लागले आहे. हे खरे असले तरी दुसऱ्या जिल्ह्यमध्ये काय घडले, काय चालू आहे, जे जाणून घेण्यापासून वाचक दुरावला आहे.
तंत्रज्ञानामुळे पत्रकारिताही झाली हायटेक
By admin | Updated: January 6, 2017 01:04 IST