तलाव बांधकाम : आयकर विभागाकडे चौकशीची मागणीआक्सापूर : विहीरगावात मागील सत्रात १० लाख रुपयांचे तलाव दुरूस्तीचे काम करण्यात आले. काम करताना ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात आला नसल्याची बाब समोर आली. या प्रकाराने खळबळ उडाली असतानाच सदर तलाव बांधकामाच्या साहित्य खरेदीतसुद्धा घोळ झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. साहित्य खरेदीत शासनाचा विक्रीकर व मुल्यवर्धीत कर बुडविला असून यातून शासनाची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगावात सन २०१४-१५ या वर्षात लघु पाट तलावाचे बांधकाम करण्यात आले. सदर कामाची रक्कम अंदाजे दहा लाख रुपये होती. हे काम पुर्णत्वास आले असताना सदर कामाची माहिती गावकऱ्यांनी माहिती अधिकारातून प्राप्त करून घेतली. विहीरगाव ग्रामपंचायत कार्यालयातून गावकऱ्यांना मिळालेल्या माहितीमध्ये कामाच्या साहित्याच्या देयकाचा समावेश आहे. ही देयके व्हॅटची नाहीत.साहित्य खरेदी करताना विक्रीकर व मुल्यवर्धीत कराचा भरणा शासनाकडे केला नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. गोंडपिपरी हे तालुका मुख्यालय असून येथे मोठी बाजारपेठ आहे. सोबतच गोंडपिपरीत लोहा, सिमेंट व गिट्टीचे अधिकृत डिलर आहेत. मात्र याही परिस्थितीत तलाव बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्याची खरेदी मूल येथील व्यावसायीकांकडून करण्यात आली. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत सिमेंट, लोहा, गिट्टी व इतर साहित्य खरेदीचे देयके हे मूल येथील असल्याने गावकऱ्यांना शंका आली. सदर देयकावरून माहितीची शहानिशा केली असता शासनाने निर्धारित केलेली विक्रीकर व मुल्यवर्धीत कराचा भरणा केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या व्यवहारातून शासनाला देय असलेले लाखो रुपये बुडाल्याचा आरोप गावकऱ्यांनी आज गोंडपिपरीत पत्रकार परिषदेतून केला आहे. याची चौकशी करून दोषी असणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी विहीरगाव येथील ग्रामस्थांनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. पत्रपरिषदेला भैया चुधरी, आनंद झाडे, निरज बढवे, जगजीवन मडावी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
साहित्य खरेदीत कर बुडविला
By admin | Updated: November 2, 2015 00:53 IST