पोलीस प्रशासनाचे आयोजन : शेकडो नागरिकांची उपस्थितीगडचांदूर : उपविभाग गडचांदूर अंतर्गत पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कोरपना येथे कोरपना तालुका दारुमुक्ती गाव मेळावा पार पडला. या मेळाव्यात तालुक्यामधील विविध गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी, नगर पंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व इतर पदाधिकारी तसेच दारुमुक्ती गाव समितीचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दारुमुक्ती गाव मेळावामध्ये गावातील अवैध दारु विक्री संबंधाने विविध समस्या, अडचणी याबाबत गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी गावकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. अवैध दारुविक्रीवर कसे आळा घालता येईल, याबाबत गावपातळीवर काय उपाययोजना राबविण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने याप्रसंगी उपस्थित महिला वर्गानी गावात अवैध दारु विक्री होऊ देणार नाही व पोलिसांना विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.उपविभाग गडचांदूर अंतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास कोरपना तालुक्यामधील विविध गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीपीओ सुधीर खिरडकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार डाखरे महाराज, प्राचार्य पाथरीकर, प्रा. दुधगवळी, आकुलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गडचांदूरचे पोलीस उपनिरीक्षक तेलगोटे यांनी केले. प्रास्ताविक गडचांदूरचे ठाणेदार विनोद रोकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन कोरपना येथील ठाणेदार विखे पाटील व त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. दारूमुक्ती मेळावा घेऊन गावकऱ्यांत जनजागृती करण्याच्या कार्यक्रमामुळे महिलांत उत्साह आहे. (वार्ताहर)
कोरपना येथे तालुका दारुमुक्ती गाव मेळावा
By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST