तळोधी (बा) : तळोधी (बा.) परिसरातील जनतेची अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेली पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार आहे. तळोधी (बा.) येथे पोलीस ठाणे सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून एका महिन्याच्या आत तळोधी (बा.) येथे नवीन पोलीस ठाणे सुरू होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या २३ जुलै २०१५ च्या अधिसूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्राखालील नागभीड पोलीस ठाणे आणि घुग्घुस पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याशी जेथवर संबंध आहे तेथवर त्यांचे अधिक्रमण करून अधिसूचनेतील अनुसूचीमध्ये नमूद केलेले स्थानिक क्षेत्र पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्राखालील नागभीड पोलीस ठाणे, तळोधी पोलीस ठाणे, घुग्घुस पोलीस ठाणे आणि पडोली पोलीस ठाणे असल्याचे घोषित केले आहे.या घोषित केलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित निर्देश केलेल्या स्थानिक क्षेत्रांचा समावेश असेल, असे निर्देशित केले आहे. यानुसार नागभीड पोलीस ठाण्यात ६८ गावे, तळोधी पोलीस ठाण्यात ४२ गावे, घुग्घुस पोलीस ठाण्यात १५ गावे तर पडोली पोलीस ठाण्यात १५ गावांचा समावेश राहणार आहे. नागभीड पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन नागभीड व तळोधी तर घुग्घुस पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन घुग्घुस व पडोली असे दोन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे. या अधिसूचनेनुसार तळोधी (बा.) पोलीस ठाण्यात तळोधी (बा), गोविंदपूर, वैजापूर, बाळापूर (बुज), वाढोणा, सावरगाव, गिरगाव, जीवनापूर, सोनापूर, खरबीर, सारंगगड, ओवाळा, पुलगाव, सावली, उश्राळमेंढा, येनोली, आकापूर, गंगासागर हेटी, वलनी मेंढा, वलनी चारगाव माना, चारगाव चके, सोनुली बुज, कोजबी चक, कोजबी माल, येनोली माल, धामणगाव, कच्चेपार, धामणगाव चक, नांदेड, ब्राह्मणी, लखमापूर, कन्हाळगाव, सोनुली कान्हा, झाडबोरी, चिखलगाव, सोनापूर (तुकूम), आवळगाव, आलेवाही, खरकाडा आदी गावांचा समावेश राहणार आहे. (वार्ताहर)
तळोधी पोलीस ठाणे सुरू होणार
By admin | Updated: October 8, 2015 00:44 IST