वरोरा : ग्रामीण भागातील नागरिकांचे काम सुरळीत होण्याकरिता तलाठी गावात भेटणे गरजेचे असते. त्याकरिता वरोरा तालुक्यातील तलाठी आठवड्यातून तीन दिवस गावातील आपल्या कार्यालयात उपस्थित राहतील, असे नियोजन नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तलाठी आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्याकरिता नेहमी तत्पर असतात. परंतु नागरिकांची वेळ व तलाठी यांचा ताळमेळ जुळत नसल्याने अनेक तक्रारी नागरिक तहसील कार्यालयात करीत असतात. यासोबतच मंडळ अधिकारी नेमून दिलेल्या कार्यालयात उपस्थित राहतात. परंतु कार्यालयीन सभा, घटना आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास जात असल्यामुळे कधीकधी ते कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. याबाबतही तक्रारी केल्या जातात. वरोरा येथील तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांची बैठक घेऊन सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवसांत तलाठी गावामध्ये उपस्थित राहण्याबाबत चर्चा केली आणि त्यानुसार नियोजन करून तलाठी व मंडळ अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. तीन दिवस तलाठी गावातच उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे मानले जात आहे. असा प्रयोग कदाचित वरोरा तालुक्यात प्रथमच राबविला जात असल्याने नागरिक चांगलेच सुखावले असल्याचे दिसून येत आहे.