तळोधी बा. येथील प्रकार : तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी घेतली नाही दखलतळोधी बा. : येथील तलाठी कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत बसून तलाठी तसेच त्याच्या दोन साथीदारांनी मद्यप्राशन केल्याचा प्र्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पंचनामा करण्यात आला. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.तळोधी साझ्याचे तलाठी परशुराम कन्नाके, तलाठी शेळकी यांनी शनिवारी रात्री ११.४० पर्यंत कार्यालय सुरु ठेवत कार्यालयातच मद्यप्राशन केले. याबाबत माहिती मिळताच पत्रकारांनी कार्यालयात जाऊन खातरजमा केली. तेव्हा पार्टी रंगात आली होती. या प्रकाराचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण करत असल्याचे तलाठ्यांच्या लक्षात येताच कार्यालयाला कुलूप ठोकून पोबारा केला. त्यानंतर महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिसांना माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार डी. डी. खटी तथा पोलीस कर्मचारी तलाठी कार्यालयात पोहचले. यावेळी टेबलवर काचेले ग्लास, रिकाम्या तथा सिलबंद दारुच्या बाटल्या, चने, शेंगदाणे आढळून आले. विशेष म्हणजे, जळत असलेली मच्छर अगरबत्ती पंचनाम्यादरम्यान आढळूनआली. कारवाई कुणी करायची यावरून नायब तहसीलदार तथा पोलिसांमध्ये वाद झाला. विशेष म्हणजे, येथील कर्मचारी काही दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत दोषी आढळून आले होते. नागरिकांनी अनेकवेळा कारवाई करण्याची मागणी केली. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. (नगर प्रतिनिधी)
तलाठी कार्यालय बनले दारुचा अड्डा
By admin | Updated: January 25, 2015 23:10 IST