जीवाशी खेळ : महेश मेंढे यांचे शल्य चिकित्सकांना निवेदनचंद्रपूर : अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना जनतेने केंद्रात व राज्यात सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमताचा कल दिला. मात्र सत्तास्थानी विराजमान होताच भाजपच्या सरकारने त्याच जनतेला बुरे दिन दाखविण्याची सुरूवात केल्याचा उत्तम दाखला म्हणजे गोरगरिबांसाठी असलेल्या सरकारी रुग्णालयातील उपचाराचे दर प्रचंड वाढविण्याचा अध्यादेश होय असे सांगत ही दरवाढ आता सर्वसामान्यांच्या जिवावर उठली, असे म्हणण्याची पाळी सरकारने जनतेवर आणली असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर सचिव व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे महेश मेंढे यांनी केला. ही दरवाढ त्वरीत कमी करण्यात यावी या मागणीचे निवेदन मेंढे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील सीटीस्कॅन मशीन बंद असल्यामुळे अनेकदा रुग्णांना खासगी रुग्णालयाचाच आधार घ्यावा लागत असल्याची तक्रारही मेंढे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना केली. चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो नागरिक या सरकारी रुग्णालयात उपचार मिळेल या आशेने येत असतात मात्र त्यांना येथे आल्यानंतर कधी डॉक्टर नाही तर कधी तपासणी करणारी सिटी स्कॅन, एक्स-रे मशीन आदी बंद असतात. यात आता उपचाराचे दर वाढल्याची भर पडली आहे. दिवसभर मजुरी करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करणाऱ्या गरिबांना हा सरकारी रुग्णालयाचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यामुळे सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अश्या मागणीचे निवेदन महेश मेंढे यांनी दिले. शिष्टमंडळात काँग्रेस किसान सेलचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिनेश चोखारे, लोकसभा युवक काँग्रेसचे शिवा राव, शहर युकाँचे अध्यक्ष प्रशांत भारती, रोशन रामटेके आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सरकारी रुग्णालयातील उपचाराचे वाढलेले दर मागे घ्या
By admin | Updated: February 9, 2016 00:52 IST