चंद्रपूर : ऊर्जामंत्र्यांनी जाहीरपणे सांगितल्याप्रमाणे कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, यासह अन्य मागण्यांसाठी नागपूर येथे ऊर्जामंत्र्यांच्या घरावर मोर्चाद्वारे जाऊन आंदोलन करणाऱ्या विदर्भवादी कार्यकर्त्यांवर नागपूर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
लॉकडाऊन काळातील नागरिकांचे सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने रोजगाराच्या अभावी उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. या लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने वीज बिल होळीचे आंदोलन करून सरकार व जनतेचे लक्ष वेधून घेतले. यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीरपणे लॉकडाऊन काळातील शंभर युनिटपर्यंतचे पूर्ण वीज बिल, तीनशे युनिटपर्यंतचे निम्मे वीज बिल आणि तीनशे युनिटपेक्षा अधिक असलेल्यांचे पंचवीस टक्के वीज बिल माफ करण्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले होते. परंतु, वीज बिल माफी झाली नाही. याच मागणीसाठी नागपूर येथे समितीचा मोर्चा निघाला. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले, महिला आघाडीप्रमुख रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर यांच्यासह ३४ प्रमुख कार्यकर्त्यांवर तेरा गंभीर कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. जनहिताच्या बाबींसाठी आंदोलन करतांना हे खोटे गुन्हे दाखल करणे दुर्दैवी बाब आहे. हे गुन्हे मागे घेतल्यास ते कुठल्याही सार्वजनिक हिताला बाधक नाही. म्हणून हे सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड. वामनराव चटप, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, कार्याध्यक्ष किशोर दहिकर, सचिव अंकुश वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना आवळे यांनी केली आहे.