चंद्रपूर: येथील प्रियदर्शिनी चौकातील डाक कार्यालयात कार्यरत एका डाक सहायकाचा संशयास्पद मृत्यू झाला. डाक कार्यालयातूनच त्याला मृतावस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे त्याच्या मृत्यू संदर्भात विविध चर्चा आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.सागर येवतकर (२५) असे मृत डाक सहायकाचे नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील सिंधूदुर्ग येथील रहिवासी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो येथील डाक कार्यालयात कार्यरत होता. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गिरी यांना विचारणा केली असता, आम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे डाक कार्यालयात नेमके काय घडले, हे सध्या सांगू शकणार नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. मात्र या घटनेची आज शहरभर चर्चा होती. सागरने विष प्राशन करूनच आत्महत्या केली, असा या चर्चेचा सूर होता. (प्रतिनिधी)
डाक सहायकाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Updated: May 13, 2015 00:02 IST