चंद्रपूर : धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग आता आॅनलाईनकडे वाटचाल करीत आहे. येत्या नवीन वर्षाला ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ या नवीन प्रणालीने स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप केले जाणार असून धान्य वाटपात पारदर्शकता येणार आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्याची साठवणूक सुरक्षित केली पाहिजे, धान्य थेट गरजुपर्यंत पोहचले पाहिजेत, पुरवठा प्रक्रियेत वेळेची बचत, पादर्शकता व लोकाभिमुखता हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बदल घडवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुरवठा अधिकारी तसेच संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नविन प्रणालीचे प्रशिक्षण दिले जात आहे. साधारणपणे येत्या नविन वर्षाच्या शुभारंभात पहिल्या दिवशी गोदामाना पुरवण्यात येणाऱ्या धान्याचा तपशील आॅनलाईन प्रणालीने संग्रहीत केला जाणार आहे. पुढील काही महिन्यात राज्यात व प्रत्येक जिल्ह्यात ही प्रणाली वापरली जाणार असल्याचे महसूल पुरवठा विभागाने सांगितले आहे. या प्रणालीमुळे गरिबांना धान्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच या विभागात होणारा काळाबाजार रोखण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांचा धान्याचा पुरवठा होत असला तरी अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक स्वस्त धान्य दुकानदार धान्याचे वाटप न करता काळ्याबाजारात धान्याची विक्री करतात. या प्रणालीमुळे या सर्व गैरव्यवहारावर आळा बसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पुरवठा विभागाची आॅनलाईनकडे वाटचाल
By admin | Updated: December 24, 2014 22:57 IST