वर्धा नदीच्या पुलावरून घेतली उडी : अंशकालीन प्राध्यापक म्हणून कार्यरत होताबल्लारपूर : जन्मदात्याच्या लग्नाचा वाढदिवस नातेवाईकासोबत आनंदात रविवारी साजरा केला. घरी आनंदाचे वातावरण होते. आपला मुलगा काही करेल, याची कल्पनाही आईवडिलांना नव्हती. मात्र घराच्या कोणालाही काही न सांगता, पहाटेच्या सुमारास दुचाकीने तो घराबाहेर पडला. दरम्यान, बल्लारपूर-सास्ती मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. अभियंता असलेल्या तरुणाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.मंगेश पंढरी गुजरकर (२५) असे मृताचे नाव असून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील तो रहिवासी आहे. तो बी.ई. झाला असून श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे अंशकालीन प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभियंताची पदवी प्राप्त केली होती.मंगेशचे वडील पंढरी गुजरकर यांचा रविवारी लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्त आप्तेष्टांची घरी रेलचेल होती. घरातील सर्व मंडळीने वाढदिवसाचा आनंद लुटला. मंगेशही यात आनंदाने सहभागी झाला होता. घरातील मंडळी साखरझोपेत असताना तो उठला. दुचाकीने तो बाहेर पडला. बल्लारपूर-सास्ती नदीच्या पुलावर त्याने दुचाकी उभी केली. नंतर पुलावरून नदीच्या पात्रात उडी घेवून जीवनयात्रा संपविली. हा प्रकार एका रुग्णवाहिका घेऊन येणाऱ्या चालकाच्या लक्षात आला. प्रारंभी प्रेमीयुगल असल्याची शंका वर्तविली जात होती. पोलिसांनी दुचाकीवरून शोध घेतला असता, तो विसापूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अखेर सायंकाळी ४ वाजता वर्धा नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. (शहर प्रतिनिधी)
विसापूरच्या तरुण अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:37 IST