हरविलेली बॅग केली परत : हारून शेख यांचा संघटनेतर्फे सत्कारचंद्रपूर : आपल्या हातून हरविलेली किंमती वस्तू परत मिळणे याकरिता भाग्यच लागते. याच गोष्टीची प्रचिती बुधवारी घडलेल्या घटनेतून समोर आली. एक व्यक्ती बॅग आॅटोतच विसरला. मात्र, याची माहिती आॅटोचालकाला मिळताच त्याने आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय देत ही बॅग संबंधित व्यक्तीला परत केली. याबद्दल मोहम्मद हारून शेख यांचा आॅटोचालक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.बुधवारी हारून शेख यांना चांदाफोर्ट रेल्वेस्थानकावरून एका प्रवाशाला गिरनार चौक येथे सोडायचे होते. त्यांनी वाहन क्र. एम.एच. ३४-७३५१ याने प्रवाशाला गिरनार चौक येथे सोडले. प्रवाशाने वाहन भाडे देत आपला मार्ग पकडला. यानंतर हारून शेख पुढच्या प्रवासाला निघाले. एक तासानंतर हारून शेख यांना आपल्या आॅटोरिक्षामध्ये बॅग असल्याचे दिसून आले. बॅगची तपासणी केली असता त्यात दवाखान्याचे कागदपत्र, लॅपटॉप, मोबाईल आणि नगदी ३ हजार रुपये असल्याचे आढळले. त्या कागदपत्रांच्या आधारावर प्रवाशाचा शोध घेण्यात आला. ही बॅग गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील आमदार येथील दिनेश देशमुख यांची होती. ही किमती बॅग त्यांच्या स्वाधीन करण्यात आली.या घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांना दिली असता त्यांनी प्रवासी दिनेश देशमुख आणि त्यांच्यासोबत असलेले डॉ. प्रशांत टोंगे, विजय भरवे, सुधाकर सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पोलीस शिपाई सुनील कुळमेथे, हरीश नन्नावरे, महिला पोलीस रिना रामटेके, प्रा. त्रिशुल बगम, प्रा. विकास निंबाळकर, प्रा. झामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण साहित्य परत केले. या प्रामाणिकतेबद्दल हारून शेख यांचा महाराष्ट्र आॅटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर, बळीराम शिंदे, उपाध्यक्ष मधुकर राऊत, जहीर शेख, जाकिर शेख, चन्ने, रवी आंबटकर तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा
By admin | Updated: March 26, 2017 00:33 IST